‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण लवकरच ‘झापुक झुपूक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात सूरज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, दिग्दर्शक केदार शिंदेंनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘झापुक झुपूक’ या चित्रपटामुळे सूरज सध्या चर्चेत आहे. नुकतीच त्याची ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत खास भेट झाली, आणि या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सूरज चव्हाणने इन्स्टाग्रामवर भरत जाधव यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सूरज भरत जाधव यांच्या पाया पडताना दिसतो, त्यानंतर तो त्यांना मिठी मारतो आणि दोघांमध्ये गप्पांचा सुरेख रंग जमतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
सूरजने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “भरत जाधव सर मला खूप आवडतात… त्यांचे चित्रपट पाहून मनसोक्त हसू येतं.” काल त्यांची भेट झाली. सर खूप भारी आहेत. त्यांनी मला ‘झापुक झुपूक’ चित्रपटासाठी खूप शुभेच्छा दिल्या आणि प्रेमाने वेळ दिला… भरत सर, मनःपूर्वक आभार… भावांनो, आज मी खूप खुश हाय! सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या ‘झापुक झुपूक’ गोलीगत शुभेच्छा…”
सूरज आणि भरत जाधव यांच्या या भेटीचा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “भावा, तुझी प्रगती बघून खूप आनंद होतोय… मोठा हो!”, “भावा, तू खरंच खूप मोठा माणूस होशील”, “सूरज भावा, तुझी मेहनत जबरदस्त आहे, अशीच प्रगती होत राहो”, “आमच्या सारख्या सामान्य मुलांचं स्वप्न तू साकार करतोयस, भावा” अशा कमेंट्सचा सोशल मीडियावर वर्षाव झाला आहे.
दरम्यान, ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत ‘पिरतीचा उनवा उरी पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. त्यामुळे आता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.